लेखक: अभय तृप्ती गिरीश नवाथे | दिग्दर्शक: वैभव आशा नरेंद्र देशमुख
शुभारंभ थिएटर्स, अमरावती निर्मित
रावण हा दशाननन होता. दशानन म्हणजे दहा भावनांचा अधिपती. राग, मत्सर, महत्वाकांक्षा, गर्व, प्रेम, भीती, सुख–दुःख, स्वार्थ आणि बुद्धी. या दहाही भावना तो पूर्णत्वाने जगला. इतक्या की त्याचा ओघ त्याला आवरता आला नाही. रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम होते. या सगळ्या भावना त्यांच्याही ठायी होत्या पण त्यांना संयम ठाऊक होता. अपयश आलं की आपल्या आतल्या भावना उत्कर्ष बिंदू गाठतात आणि त्या ओघात वाहवत जाऊन आपणच स्वतःचे शत्रू होतो. राम आणि रावण या व्यक्तिरेखा एकमेकांच्या विरुद्ध का आहेत हे जाणून घेण्याचा प्रवास म्हणजे नाटक दशानन!
दसरा उत्सवाच्या जागेचा वाद, गावातील विकासाचा प्रश्न आणि दसरा उत्सवाला सादर होणाऱ्या नाटकातील भूमिकांची झालेली अदलाबदल. असे निर्णय गावातल्या विशेष चावडीत घेतल्या जातात. अगदी राम साकारणाऱ्याला अचानक रावणाची भूमिका देण्यात येते आणि देशमुखांचा राघव आता “मी रावण आहे” असं सिद्ध करायला निघतो. रावणाच्या बाजूने जे जे त्याला मांडता येतं ते सगळं तो खऱ्या आयुष्यात वागायला लागतो. पत्नी शरयूचा समजूदारपणा आणि वडील अण्णासाहेब देशमुखांच्या राम होऊन दाखवण्याच्या अपेक्षा यातून सुरू होतो प्रवास राघवाचा रावणाकडे…..!
जुन्या आणि नव्याचा उंबरठ्यावर उभ्यासलेल्या आजच्या तरुणांच्या एकूणच मनोवस्थेचा आविष्कार या नाटकात होतो. चांगले वाईट भेद दूर सारून राम आणि रावण प्रत्येक वृत्तीत आदर्श शोधण्याचा प्रवास नाटकात केला जातो.

Reviews
There are no reviews yet.